कळसूत्री बाहुली..मा. मु. साहेब..चाळीस लफंगे; शिवसेनेची शिंदे सरकारवर कडाडून टीका

कळसूत्री बाहुली..मा. मु. साहेब..चाळीस लफंगे; शिवसेनेची शिंदे सरकारवर कडाडून टीका

साधू मारहाण प्रकरणावरुन शिवसेनेचा सामनातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

मुंबई : सांगलीमध्ये पालघर घटनेची पुनरावृत्ती होता होता राहीली होती. मुले चोरणारी टोळी समजून उत्तरप्रदेशमधील साधूंना मारहाण केल्याचे समोर आले होते. यानंतर राज्यात विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले होते. यावरुनच आज शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रत्येक भाजपवाला तेव्हा पालघरच्या साधुकांडावर आपले ज्वलंत विचार मांडून शोकमग्नतेचे दर्शन घडवीत होता. मग ही शोकमग्नता, ती आपटाआपटी सांगलीच्या साधुकांडात का बरे दिसू नये? पालघरचे साधू हिंदू आणि सांगलीतले मार खाल्लेले साधू भगव्या वेशातले ‘अरबी’ होते काय? की त्यांनीही पालघरमधील साधूंप्रमाणे मरायला हवे होते? पालघरच्या साधुकांडानंतर हिंदुत्वाच्या नावाने फुरफुरणारी घोडी सांगली प्रकरणात ‘लीद’ टाकत आहेत. भाजपचे ते सर्व हिंदुत्ववादी ताई, माई, बाई मंडळही लवंग्यातील साधुकांडावर बोलताना, रडताना दिसत नाहीत. ते रविशंकर प्रसाद, गिरिराज शंकर, कोणीएक सांबीत पात्रा सांगली साधुकांडात छाती पिटताना दिसू नयेत याचे आश्चर्यच म्हणायला हवे, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

साधूंची भगवी वस्त्र आताही रक्ताने भिजलीच, साधूंची डोकी फुटली, बरेच काही झाले. तरीही भाजपचे हिंदुत्व झंडू बाम चोळत पडले आहे. यालाच आम्ही ढोंगी हिंदुत्व म्हणतो! महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पालघरच्या साधुकांडाचे घाणेरडे राजकारण करणारे आज सत्तेत आहेत. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत सत्ता स्थापन केल्याने हिंदुत्व सुटले म्हणून आम्ही शिवसेनेशी बेइमानी केली, असे सांगणाऱ्या त्या चाळीस लफंग्यांनाही सांगली जिल्हय़ातील लवंगा गावातील भगव्या साधूंचा करुण आक्रोश ऐकू गेला नाही. अर्थात अशा ढोंगी बनावट मंबाजींकडून हिंदुत्वाची अपेक्षा करणे म्हणजे रेडय़ाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखेच आहे. आता म्हणे भाजपचे कळसूत्री बाहुले ‘मा.मु.’साहेब ‘हिंदू गर्व यात्रा’ काढणार आहेत. सांगलीतील साधुकांडावर यांनी ‘ब्र’ काढला नाही हे विशेष. ‘मा.मु.’ साहेबांना भाजपने हिंदूंचे तीर्थराज म्हणूनच काय ते घोषित करावे. तेवढेच काय ते आता बाकी उरले आहे! राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची भगवी लक्तरे सांगलीच्या वेशीवर टांगलेली स्पष्ट दिसत आहेत, अशा शब्दात शिवसेनेने एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com