'महाबलीपुरमला फिरवा, साबरमतीच्या किनारी झुलवा, चीन शेवटपर्यंत कुरापतखोरच राहणार'

'महाबलीपुरमला फिरवा, साबरमतीच्या किनारी झुलवा, चीन शेवटपर्यंत कुरापतखोरच राहणार'

चीनवरुन शिवसेनेची मोदी सरकारवर जोरदार टीका

मुंबई : 26/11 चा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला आहे. भारत आणि अमेरिकेने हा प्रस्ताव दिला होता. मात्र, चीनने नकाराधिकार वापरून या प्रक्रियेला बाधा आणली आहे. यावरुन शिवसेनेने सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाईचा आव आणायचा आणि चीनने खोडा घालून तो दहशतवादी ‘मोकळा’ राहील हे पाहायचे. चीन आणि पाकिस्तान यांच्या या ‘दोन पात्री’ नाटकाचा प्रयोग भारतासाठी नवीन नाही. भारताबाबत खोडा घालायची चिन्यांची खोड जुनीच आहे. लडाखपासून सिक्कीम-अरुणाचल प्रदेशपर्यंत घुसखोरी, लष्करी अतिक्रमण, भारताचा भूभाग गिळंकृत करून त्यावर आपला दावा ठोकणे हे चिन्यांचे उद्योग गेल्या सहा-सात दशकांपासून अव्याहत सुरू आहेत.

आता साजिद मीर या दहशतवाद्याचा बचाव करून चीनने पुन्हा त्याचे खरे दात दाखविले आहेत. चीनचे हे नेहमीचेच आहे. दोन दिवसांपूर्वी रशियात समरकंद येथे ‘शांघाय सहकार्य संघटने’ची वार्षिक परिषद झाली. त्यात पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शेजारी उभे असूनही त्यांच्याशी ना हस्तांदोलन केले ना त्यांना ‘स्माईल’ दिले. भारताने म्हणे हा चीनला कडक वगैरे संदेश दिला! मग आता साजिद मीर या आपल्यासाठी मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्याचा थेट संयुक्त राष्ट्रात बचाव करून चीननेही आपल्याला ‘संदेश’च दिला, असे म्हणावे लागेल, असा निशाणा मोदी सरकारवर साधला आहे.

एकीकडे सैन्य माघारीचा देखावा करायचा आणि दुसरीकडे जमेल तेथे, जमेल तसा भारताला दगा द्यायचा. भारताच्या विरोधात कायम खोडा घालायचा, हे चीनचे पूर्वापार धोरण आहे. तुम्ही चिन्यांना महाबलीपुरमला फिरवा, साबरमतीच्या किनारी झुल्यावर झुलवा किंवा समरकंदमध्ये त्यांना ‘अंतर’ वगैरे दाखवा, चीन हा आपल्यासाठी शेवटपर्यंत कुरापतखोरच राहणार आहे. दहशतवादी साजिद मीर याचा संयुक्त राष्ट्रात बचाव करून चीनने तेच दाखवून दिले आहे, असे शिवसेनेने म्हंटले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com