इतके दळभद्री लोकं आमचे सहकारी होते, याची लाज वाटते; राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली आहे. शिंदे गटाने शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यालयातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी तुम्हाला मानसन्मान दिला. ज्यांचे तुम्ही मीठ खाल्ले, त्यांचा फोटो तुम्ही काढता, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल. इतके दळभदरी लोकं आमचे सहकारी होते, याची लाज वाटते, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेच्या व्हिपवरुन राडा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. व्हिप न पाळल्यास दोन आठवड्यात कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाच्या वकिलांनी तशी कमिटमेंट देखील केली होती. याचा अर्थ ते कोर्टाला जुमानत नाही. त्यांना वाटतंय आम्ही कोर्ट देखील खिशात घेऊन फिरू. परवा गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही पक्ष का सोडला ते? त्यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं होतं, हे स्पष्ट आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
तर, कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी हा अत्यंत गंभीर आरोप आहे. या महाराष्ट्रात फक्त पैशाचेच राज्य सुरू आहे. पुण्यातील जनता त्यांना धडा शिकवेल. त्यांच्या गद्दारीची दखल जगातील 33 देशांनी घेतली आहे, अशी टीका केली.
दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा लोकशाहीवरील जबरदस्त हल्ला आहे. ते उपमुख्यमंत्री आहे. अनेक खाते देखील त्यांच्याकडे आहे. त्यांनी शाळांना जो दर्जा प्राप्त करून दिला, त्याची जगात वाहवा होते आहे. हा अशा प्रकारे एका व्यक्तीचा निर्णय नसतो. केंद्रीय तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारविरोधात संघर्ष करावा. एकत्र येऊन लढल्याशिवाय ही झुंडशाही संपणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.