'शिंदे गटाचा गुवाहाटीफेम सिनेमा किंवा तमाशा जनताच डब्यात घालणार'

'शिंदे गटाचा गुवाहाटीफेम सिनेमा किंवा तमाशा जनताच डब्यात घालणार'

विधिमंडळातील सत्ताधारी-विरोधकांच्या राड्यावरुन सामनातून शिंदे गटावर निशाणा

मुंबई : पावसाळी अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहिला मिळाला. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने येत धक्काबुक्की झाली. यावर सर्वच स्तरावरुन टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना अग्रलेखातून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचा गुवाहाटीफेम सिनेमा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

असभ्य शब्दांचा वापर, अर्वाच्य शिवीगाळ आणि खेचाखेची व धक्काबुक्कीची ही घटना पाहून विधान भवनाच्या निर्जीव भिंतींनीही नक्कीच अश्रू ढाळले असतील. सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधक तेव्हाही आक्रमक होत असत; पण त्या लढाईत व्यक्तिगत कटुता कधीच नव्हती. सत्तारूढ पक्ष व विरोधक दोन्ही बाजूंनी शालिनता कधीच सोडली नव्हती. पण महाराष्ट्राच्या विधिमंडळ आवारात बुधवारी जे घडले तो या शालीन परंपरेच्या चिंधड्या उडवणारा प्रकार होता. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे खरेच; पण सत्तेवर असलेल्यांनी संयमी असायला हवे. हा संकेत आजवरच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी आवर्जून पाळला. आता मात्र तसे होताना दिसत नाही, अशी टीका शिवसेनेने शिंदे गटावर केली आहे.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्यांचे सध्या एकच धोरण आहे. एकतर विरोधकांना देशाचे शत्रू ठरवायचे, बोली लावून त्यांना खरेदी करायचे आणि ऐकलेच नाही तर फुटकळ प्रकरणात चौकशा लावून त्यांना तुरुंगात डांबायचे. विरोधकांचा आवाज दडपण्याचा देशाच्या राजधानीतून आलेला हा साथीचा आजार आता गुजरात-आसाम रिटर्न सरकार महाराष्ट्राच्या सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या राजधानीतही पसरला नसता तरच नवल, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून जी धुमश्चक्री घडवली गेली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती अशी की, सुरळीत राज्यकारभार करण्यावर या सरकारचा विश्वास दिसत नाही. संसदीय लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक वगैरे शब्दांशी सपशेल फारकत घेऊन गोंधळ करण्यावरच भर द्यायचा, असे धोरण तर गुवाहाटी फेम सरकारने आखले नाही ना, अशी शंका आता विरोधकांनाच नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेलाही येऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक समृद्ध अशी राजकीय परंपरा आहे; पण ही मौलिक परंपरा पायदळी तुडवतानाचे दृश्य बुधवारी साऱ्या जगाने बघितले. सत्तारूढ शिंदे गटाने विधिमंडळाच्या आवारात घडवलेल्या धुमश्चक्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. त्यानंतरही ‘ये तो एक ट्रेलर था,’ अशी धमकी दिली जात असेल तर शिंदे गट भविष्यात महाराष्ट्राला कोणता ‘पिक्चर’ दाखवण्याच्या तयारीत आहे? अर्थात सरकारचा हा गुवाहाटीफेम सिनेमा म्हणा किंवा तमाशा, महाराष्ट्राची जनताच उद्या डब्यात घातल्याशिवाय राहणार नाही, एवढे ध्यानात ठेवा, असा इशाराही शिवसेनेने शिंदे गटाला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com