शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो हिंदूंचा आवाज ऐकतो; हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर राऊतांचे विधान
मुंबईत आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्च्यामध्ये भाजपचे अनेक मोठे नेते आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी शिवसेना भवनासमोर घोषणाबाजी केली. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी या मोर्चावर प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन शक्तीमान हिंदू नेत्यांचे देशात राज्य आहे. महाराष्ट्रात देखील हिंदुंचे राज्य आले सांगण्यात येत, तरी देखील राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. असे विधान त्यांनी यावेळी केले.
काय म्हणाले संजय राऊत?
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचे राज्य असताना असा मोर्चा काढावा लागणं हे दुर्देवाचे आहे. हिंदूंचा आवाज दाबला जात आहे. या देशात स्वत:ला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे असे मोर्चे काढावे लागत आहेत. हे हिंदूंचे दुर्देव आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, आठ वर्षांपासून हिंदू समाजाचा आक्रोश सुरू आहे. मग हिंदूंना कुठं न्याय मिळाला. काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित रस्त्यावर बसून न्याय मागतोय. ज्या मुलायमसिंह यादव यांनी रामसवेकांवर गोळ्या चालवल्या त्यांचा नरेंद्र मोदी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. त्यामुळे या विरोधात आजचा आक्रोश मोर्चा आहे. असे आक्रोश मोर्चे निघाले पाहिजेत. आजच्या या मोर्चेकरांनी शिवसेना भवनासमोर येऊन आक्रोश करावा लागला कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो हिंदूंचा आवाज ऐकतो. असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.