Sharad Pawar In Rain
Sharad Pawar In Rain

Sharad Pawar In Rain : शरद पवार पुन्हा पावसात भिजले! पाहा व्हिडीओ

Solapur News: शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे संपूर्ण राज्यासह देशाच्या चर्चेच्या विषय ठरलेले आहेत. ज्यामुळे राज्याचे राजकारण हे फक्त आणि फक्त शरद पवार यांच्याच आजूबाजूला फिरत असल्याचे पाहायला मिळाले. शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर जरी आता पडदा पडलेला असला तरी शरद पवार यांची चर्चा होणे कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. पण शरद पवार आता चर्चेत आले आहेत, ते पुन्हा एकदा पावसात भिजल्याने. एका सहकाऱ्याला दिलेल्या शब्दामुळे शरद पवार यांनी भर पावसांत भिजत लग्न सोहळ्याला हजेरी लावली.

सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर वसंत सपाटे यांच्या पुतण्याचा लग्न सोहळा रविवारी (ता. 07 मे) पार पाडला. या लग्न सोहळ्याचे आमंत्रण शरद पवार यांना देखील देण्यात आले होते. त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळत पवारांनी वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी भर पावसात लग्न सोहळ्याला हजेरी लावली. पण अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. ज्यामुळे लग्नात उपस्थित असलेल्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. पण तेव्हाच नेमेके शरद पवार हे देखील तिथे आल्याने शरद पवार यांना पावसांत भिजावे लागले.

शरद पवार यांनी शुक्रवारी राजीनामा नाट्यावर पडदा टाकल्यानंतर ते लगेच शनिवारपासून दौऱ्यावर निघाले. रविवारी सकाळपासूनच त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केला. सुरुवातीला पंढरपूर त्यानंतर सांगोला येथे कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांना या लग्न सोहळ्याला यायला काहीसा उशीर झाला. त्याच वेळी सोलापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शरद पवार या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही, अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आपल्या सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी शरद पवार यांनी भर पावसात देखील या सोहळ्याला हजेरी लावली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com