...तिथे पेटून उठायचं; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट

...तिथे पेटून उठायचं; प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट

प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषणावरुन दसऱ्याबाबत राज ठाकरेंचे संकेत?

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय गोंधळ सुरु आहे. कोणाचे हिंदुत्व खरे, यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्शवभूमीवर राज ठाकरेंनी एक सूचक पोस्ट ट्विटरवर केली आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज ठाकरे यांनी ट्विट करत त्यांचे भाषण शेअर केले आहे. ते म्हणाले की, आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती. ह्या जयंतीनिमित्त आजोबांचं एक दुर्मिळ भाषण, इथे मुद्दामून देत आहे. ते जरूर ऐका. हे भाषण एका 'कृतिशील' विचारवंताच आहे. माझ्या आजोबांचा धर्म ह्या कल्पनेला विरोध नव्हता, उलट ते कमालीचे हिंदू धर्माभिमानी होते. फक्त धर्माच्या नावाखाली चालणारी भोंदूगिरी, फसवेगिरी त्यांना रुचायची नाही, आणि असल्या भोंदूगिरी करणाऱ्यांवर ते हल्ला चढवत. थोडक्यात आख्ख आयुष्य त्यांनी लोकांच्या मनातील धर्माची भीती काढून, धर्माबद्दल आस्था, प्रेम निर्माण व्हावं म्हणून वेचलं. ह्या भाषणात त्यांनी नाठाळांवर वेळेस रट्टे ओढताना मागे पाहू नका असं आवाहन केलं आहे आणि हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत हे विसरू नका ह्याची आठवण करून दिली आहे.

'रझाकारी' औलादी डोकं वर काढत आहेत, अनेक ठिकाणी आया-बहिणींची छेड काढत आहेत, ह्या भाषणात आमच्या आजोबांनी जसं म्हणलं आहे तसं त्यांच्या गालावर वळ उठवा. आणि हे करताना मी ह्या पक्षाचा, त्या पक्षाचा असला विचार करायची गरज नाही. कदाचित तुमचे नेते कच खातील, पण तुम्ही खाऊ नका... प्रबोधनकारांना अभिवादन करताना एक निर्धार प्रत्येकानेच केला पाहिजे कि, जिथे कुठे अन्याय दिसेल तिथे पेटून उठायचं आणि अन्यायाचा फडशा पाडायचा... हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.

प्रबोधनकार ठाकरेंचे दुर्मिळ भाषणातले काही मुद्दे

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करतात. आणि सीमोल्लंघन केल्यानंतर तिथून सोनं लूटून आणायचं असतं. आज आपल्याभोवती इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या भानगडींच्या, अडचणींच्या निराशेच्या सीमा पडलेल्या आहेत की, आपल्या पुर्वीच्या प्रथेप्रमाणे नुसती गावाची एक सीमा उल्लंघून आपल्याला जमणार नाही. तेवढयासाठी संबंध महाराष्ट्राचा एकजात मराठा, छत्रपतींची शपथ घेऊन, मी महाराष्ट्राचा अभिमानी लेक आहे, मुलगी आहे. यापुढे कोणाच्याही प्रतीटोल्याची तमा न ठेवता समोर येईल ती सीमा तुडवीत मी माझं इप्सित साध्य करीन अशी त्याने हिंमत बाळगली पाहिजे.

महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये. ही वाघाची अवलाद आहे आणि या वाघाला कोणी डिवचलं तर त्याचा परिणाम काय होईल, याचे इतिहासामध्ये दाखले आहेत. म्हणून आपल्याला सीमोल्लंघन करायचंय. ते सीमोल्लंघन करताना प्रत्येक ठिकाणी छत्रपतींचं नाव घेऊन, संकटात उडी घालून अन्यायाचा फडशा पाडायचा, असा निश्चय केला पाहिजे, असे त्यांनी शेवटी म्हंटले आहे.

दरम्यान, मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेना-शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत दोन्ही गटाने मुंबई महापालिकेरडे परवानगी मागितली आङे. यामुळे महापालिकाही मोठ्या पेचात अडकली असल्याचे दिसत आहे. अशात पर्यायी व्यवस्था म्हणून बीकेसी मैदानाचीही चाचपणी करण्यात येत आहे. यामुळे शिवतीर्थावर कोणाचा दसरा मेळावा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com