भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस; या संघटनेनी केली घोषणा?
राज्याच्या राजकारणात राजकीय गदारोळ सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबाबत विधान केले आहे. शनिवारी नाशिकमध्ये बोलत असताना त्यांनी हे विधान केले होते. मात्र, त्या विधानानंतर आता वाद वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळांच्या या विधानानंतर आता राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. त्यावरच परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्षांनी मोठं विधान केले आहे.
जो तरुण छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारेल, त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे. यापूर्वीही छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी त्यांनी माफी मागितली होती. ते सातत्याने हिंदू समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करीत आहेत. विशिष्ट समाजाचा विरोधात गरळ ओकतायेत. त्यांनी कोणाची पुजा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु समाजात तेढ निर्माण करु नये, असे परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी म्हटले आहे.
काय होते भुजबळांचे विधान?
शनिवारी नाशिकमध्ये बोलताना भुजबळ म्हणाले होते की, ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी नावे नसतात, तसेच काही जणांना सरस्वती आवडते, तर कोणाला शारदा आवडते. आम्ही काय त्यांना पाहिले नाही. आमचे शिक्षण झाले ते महापुरुषांमुळे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले करुन दिली, असे भजबळ म्हणाले होते.