सर्वांना आरक्षण मिळावं पण...; सुनील तटकरेंची भूमिका
गोंदिया : मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मागणी करीत आहेत. तर एकीकडे मराठा समाजाचा एक मोठा गट मराठ्यांना सरसकट वेगळा आरक्षणासाठी मागणी करत असल्याची दिसून येत आहे. यावर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे. पण, ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू नये. त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं. परंतु, अनुसूचित जमातीचे आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाबरोबरच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा अभूतपूर्व यश मिळाला आहे. याबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार यांनी घेतलेला जो निर्णय होता तो आज लोकांनी सार्थक ठरवलेला आहे आणि त्यामुळेच आज अजित पवार गटाला एवढा मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या असल्याचा दावा त्यांनी केला.
बारामती येथील बाराच्या बाराही जागा अजित पवार गटाने काबीज केल्या आहेत. ही अजित पवारांची शरद पवार यांच्यावर मात नसून बारामतीकरांनी दादांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. तसेच, आम्ही दादांसोबत आहोत हे दाखवण्यासाठी बारामतीकरांनी हा कौल दिला असल्याचे सांगितले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची आता वेळ येणार नाही. महाराष्ट्रातील महायुती सरकार हे मराठ्यांना सर्वत्र टिकेल असे आरक्षण देणार आहेत आणि त्या दृष्टीने सरकारने सुद्धा प्रयत्न करीत आहेत आणि आरक्षण टिकेल, अशा भूमिकेत सरकार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना कोणते आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.