अजित पवार आमचेच नेते; सुप्रिया सुळे विधानावर ठाम, मी पुन्हा एकदा सांगते...
पुणे : अजित पवार आमचेच नेते आहेत, असे विधान सुप्रिया सुळेंपाठोपाठ शरद पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. तर, चर्चांना मोठे उधाण आले आहे. परंतु, काही तासांतच शरद पवारांनी घुमजाव करत हे मी बोललो नसल्याचे म्हंटले आहे. मात्र, सुप्रिया सुळेंनी मी विधानावर ठाम असल्याचे म्हंटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील हे अध्यक्ष आहे. मी आधी जे बोलले त्यावर मी ठाम आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे. तर, पक्षातील नऊ आमदारांनी, दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे इतकेच. त्यांना नोटीस पाठवलेली आहे. पक्षांमध्ये वेगळी भूमिका घेणाऱ्याना निलंबित करण्याबाबत पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांना परत घेणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या विषयावर बोलण्याइतपत मी मोठी नाही. शरद पवार सकाळी बोलले, तो त्यांचाच अधिकार आहे. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच, मी दादांबरोवर गुप्त बैठका केलेल्या नाहीत. भावाला भेटायला गुप्तता बाळगण्याचे कारणच काय? आम्ही पारदर्शीपणे काम करतो, असेही त्यांनी सांगितले.
मी बावनकुळे यांचे आभार मानते. 303 खासदार आणि 105 आमदार त्यांच्याकडे आहेत. तरीदेखील त्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्याकडे यावेसे वाटतात. याचा अर्थ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये कुछ तो खास बात है, असेही सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.
दरम्यान, शरद पवारांनी आपल्या विधानावर खुलासा केलेला आहे. आमचे नेते अजित पवार आहेत हे मी बोललो नाही. सुप्रिया सुळे बोलल्या आहेत. त्याबाबत त्याच सांगू शकतात, अजित पवार आमचे कोणतेही नेते नाहीत. पहाटेच्या वेळी एक संधी दिली. मात्र, ही संधी सारखी द्यायची नाही, आता संधी मागायची नसते आणि मागितली तरी द्यायची नाही ही आमची मनीषा स्पष्ट आहे, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.