महाराष्ट्राची हात जोडून माफी मागावी, सुप्रिया सुळेंचा भाजपवर घणाघात
महाविकास आघाडीचे सरकार असताना ईडीच्या कारवाईमुळे आमदार प्रताप सरनाईक सर्वाधिक चर्चेत ठरले होते. मात्र, राज्यात झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर आता राज्यात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाची आणि भाजपाची सत्ता आहे. त्यानंतर शिंदे गटाचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीच्या कचाट्यातून सुटका होणार असल्याची शक्यता दिसत आहे. मात्र, याच प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
भाजपाने ईडीची चौकशी लावून ब्लॅकमेल केल्यामुळेच सरनाईक शिंदें गटात सामील झाले. सरनाईक यांच्यावरील आरोप खोटे आहेत तर भाजपाने त्यांची आणि महाराष्ट्राची हात जोडून माफी मागावी. पुढे त्या बोलताना म्हणाल्या की, भाजपाने देशासमोर राज्याची प्रतिमा खराब केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे खोटे आरोप झाले नंतर ते सरकारमध्ये सामील झाले. यानंतर त्यांना क्लिनचीट देण्यात आली. त्यांच्यावर खोटे आरोप झाले की, ब्लॅकमेल करण्यात आले, याला राजकारण म्हणत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजप निशाणा साधला.
काय होते सरनाईक यांच्यावर आरोप?
टॉप्स ग्रुप कंपनीला एमएमआरडीएला 350 ते 500 सुरक्षा रक्षक पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते. 2014 साली झालेल्या कंत्राटामध्ये प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानेच ही तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी टॉप्स ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांना ईडी अटक देखील केली होती.