आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल; म्हणाल्या, शांत बसला तरी गुन्हा ठरतो का?
संभाजीराजे छत्रपती यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. त्याच आव्हाडांच्या अटकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
काय म्हणाल्या सुळे?
राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी आवाज उठवल्यामुळे त्यांना अटक झाली असेल तर त्याचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खोटा सांगितला जात असेल आणि त्याविरोधात आवाज उठवला जात असेल तर आम्हा सर्वांना अटक झाली तरी चालेल. आम्ही सर्व जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही जेलभरो आंदोलन करायला तयार आहोत, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली.
पुढे त्या म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर कुठून दबाव येतोय? ही अटक कोणत्या सेक्शनखाली होतेय? व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड मारमारी करताना दिसतायत का? मी व्हिडिओ पाहिला, त्यात आव्हाड हाताची घडी घालून उभे आहेत. मग शांत बसला तरी गुन्हा ठरतो का? सत्ता काबीज करण्यासाठी यांना काय काय करावं लागतंय. शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देत असाल तर चुकीचे आहे. यामागे पोलिसांवर कुणाचा दबाव आहे, हे शोधा, असे विधान सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.