...तर महिला विधेयकाची गत, तेच चेहरे तेच मोहरे आणि आटलेल्या विहिरीत फुटलेले पोहरे; अंधारेंचा निशाणा
चंद्रशेखर भांगे | पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज नवीन संसद भवनात कामकाज सुरु झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षणाचे विधेयक मांडले आहे. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिला आरक्षण विधेयकाचे भिजत घोंगडे गेली सत्तावीस वर्षापासून पडून आहे. पहिल्यांदाच मोदींनी असे विधेयक क्रांतिकारी पद्धतीने आणले असा जर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील मिसरूड न फुटलेल्या भक्तूल्यांचा समज असेल तर त्यांना हा इतिहास माहित असायला हवा.
जर यावेळी पुन्हा एकदा महिला आरक्षण विधेयकावर साधक-बाधक चर्चा होत असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु, असे आरक्षण सरसकट असण्यापेक्षा यातील एससी-एसटी, ओबीसी मायक्रो-ओबीसी यांच्या जागा कशा असतील हे सुद्धा विस्तृत यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याआधी जेव्हा महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सोनिया जी गांधी यांच्या पुढाकाराने मांडले गेले. तेव्हा बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी विरोध केला असा कांगावा भारतीय जनता पार्टीने केला होता. मात्र, मायावतींनी घेतलेली भूमिका ही एससी-एसटी, ओबीसीच्या महिलांचे आरक्षण वितरण कसे असेल हे आधी सांगा, अशी होती. आणि विशेषत्वाने अशा आरक्षण वितरण व्यवस्थेला विरोध तत्कालीन भाजप नेत्या उमा भारती किंवा सुषमा स्वराज यांनी केला होता हे ज्ञात असावे, असेही त्यांनी सांगितले.
जर विविध प्रवर्गातून आलेल्या महिलांच्या आरक्षणाची यात चर्चा होणार नसेल आणि पुन्हा सरसकट प्रस्थापितांच्याच महिला पुढे येणार असतील तर मग या विधेयकाची गत, तेच चेहरे तेच मोहरे आणि आटलेल्या विहिरीत फुटलेले पोहरे अशी होईल, असे सुषमा अंधारे यांनी म्हंटले आहे.