उदय भाऊ आणि भाचा नितेश...; 'त्या' फोटोंवर सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर

उदय भाऊ आणि भाचा नितेश...; 'त्या' फोटोंवर सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर

महाप्रबोधन यात्रेचे फोटो ट्विट करत भाजप नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाची खिल्ली उडवली आहे. याला आज सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रेची शेवटची सभा शनिवारी बीडमध्ये पार पडली. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात केला. परंतु, या सभेचे फोटो ट्विट करत भाजप नेते नितेश राणे आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाची खिल्ली उडवली होती. याला आज सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

उदय भाऊ आणि भाचा नितेश...; 'त्या' फोटोंवर सुषमा अंधारेंचे चोख प्रत्युत्तर
कोकणवासियांच्या गणेशोत्सव प्रवासावर दलालांचा डल्ला

नितेश राणे यांनी फोटो शेअर करत शकुनीमामाचा बीड मध्ये FLOP शो. महाप्रबोधन म्हणे, असा टोला संजय राऊतांना लगावला होता. तर, उदय सामंत यांनी महा प्रबोधन सभा बीड... प्रचंड गर्दी... शुभेच्छा, असा निशाणा त्यांनी ठाकरे गटावर साधला होता. यावरुन आता सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टवरुन उत्तर दिले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत भाऊ आणि भाचा नितेश राणे यांनी अत्यंत घाईघाईने महाप्रबोधन यात्रेचे सभा फ्लॉप गेली असे म्हणत रिकाम्या खुर्च्यांचे फोटो पोस्ट केले. मात्र, घरात आई आजारी असल्याने माझी आजची सगळ्यात मोठी प्राथमिकता आईला चांगल्या न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जाणे ही होती. त्यामुळे मला धड फोटो पोस्ट करता आले नाहीत किंवा सामंत-राणे यांना उत्तरही देता आले नाही, असे सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.

महाप्रबोधन यात्रेची त्यांना वाटत असलेली काळजी अगदीच नाहक आहे. महाप्रबोधन यात्रेचे ओरिजनल फोटो पाठवत आहे कृपया चेक करा. उदयभाऊ, एकवेळ नितेश राणे यांचे मी समजू शकते पण आपल्या हातूनही गफलत व्हावी कमाल आहे. आपण जे रिकाम्या खुर्च्यांचे फोटो पोस्ट केलेले आहेत ते महाप्रबोधन यात्रेचे नसून वरळीतील शिंदे साहेबांच्या सभेचे फोटो आहेत, असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला आहे.

फोटो पोस्ट करताना पुन्हा अशी गफलत होऊ नये यासाठी निव्वळ काळजी म्हणून सांगतेय, एकदा चष्म्याचा नंबर तपासलेला बरा, असा निशाणाही त्यांनी साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com