'शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा प्लान, लोक बॅगा भरून तयारच होते मात्र...'

'शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा प्लान, लोक बॅगा भरून तयारच होते मात्र...'

ठाकरे गटाचे मुखपत्र सामना संपादकीयमधून भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे.

मुंबई : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र सामना संपादकीयमधून भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण, असा घणाघातही केला आहे.

Kerala Malappuram Boat Capsize : केरळमध्ये मोठी दुर्घटना; बोट उलटून 21 पर्यटकांना जलसमाधी, बचावकार्य सुरू

शरद पवार यांनी जे राजीनामा नाटय़ केले ते ‘नौटंकी’ होते, अशी टीका भाजपने केली. भारतीय जनता पक्ष हा एक पोटदुख्या पक्ष आहे. भाजपची पोटदुखी अशी की, शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा व आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा एका गटाचा आग्रह होता व पवारांनी ते करण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पक्षाच्या प्रमुख पदावरून निवृत्तीची घोषणा करताच महाराष्ट्राच्या राजकारणास विजेचा झटका बसला, असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, त्यांना थांबवणार नाही, असे पवारांनी सांगितले. म्हणजेच लोक जाणार होते किंवा तूर्त थांबले आहेत. भाजपच्या लॉजिंग-बोर्डिंगमधले बुकिंग अद्यापि रद्द झालेले नाही हे स्पष्ट आहे. जे जातील त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकीरडय़ावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळे भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे. भारतीय जनता पक्षाच्या घरास दरवाजा काय, साधा पडदाही नाही. कोणीही आत घुसतो आहे. नैतिकता व नीतिमत्ता औषधालाही उरलेली नाही. आज सीबीआय, ईडीच्या भयाने भाजपात प्रवेश करून तात्पुरता दिलासा मिळेल. पण डोक्यावरची तलवार लटकती ठेवूनच पुढे जगावे लागेल.

स्वतःस तालेवार-मातब्बर वगैरे समजणाऱ्यांना हे समजत नसेल तर आजपर्यंतचे त्यांचे वागणे, बोलणे, डोलणे फुसकेच होते असेच मानायला हवे. भारतीय जनता पक्षाला लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकायच्या नाहीत. तेवढी त्यांची कुवत नाही, तर विरोधकांची बलस्थाने फोडून व ती फोडण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करून त्यांना राजकारण करायचे आहे. शंभर दिवस शेळी बनून जगायचे की एक दिवस वाघ बनून जगायचे, याचा विचार भाजपसाठी बॅगा भरणाऱ्या प्रत्येकाने करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी लढण्याचा निर्धार केला. शरद पवार यांनी अखेरपर्यंत लढू असे सांगितले. हे झाले महाराष्ट्रातले, पण लालू यादव, के. सी. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, स्टॅलिन हे नेतेही लढायला उतरले आहेत हे महत्त्वाचे. कार्यकर्ते लढतच असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो! सर्वच पक्षांतील डरपोक सरदारांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन करावा म्हणजे लोकांना कळेल, खरे मर्द कोण, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com