'उद्धवजी हाच आमचा ब्रँड, या लोकांना आम्ही धडा शिकवू' अंबादास दानवेंचा शिंदे गटावर घणाघात
राज्यात सध्या प्रचंड राजकीय खलबतं उघडणं दिसत आहे. त्यातच नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आधीपासून सुरु असलेला वाद आता आणखीच तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सध्या चालू विविध विषयावर भाष्य केले आहे. मशाल किंवा जी काही निशाणी मिळेल. पण उद्धवजी हाच आमचा ब्रँड आहे, या लोकांना आम्ही धडा शिकवू. असे दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
काय म्हणाले अंबादास दानवे?
इगतपुरीमध्ये माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली झळाळून निघेल, आम्ही गावा गावात जाऊ आणि चिन्ह चोरल्याचे जनतेला सांगू. मशाल किंवा जी काही निशाणी मिळेल पण उद्धवजी हाच आमचा ब्रँड आहे, या लोकांना आम्ही धडा शिकवू. असा इशारा त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिला. सोबतच ते म्हणाले की, ते व्हीप देतील आणि शिवसेना आमदारांना लागू होईल हे बिल्कुल होणार नाही. असे देखील स्पष्टपणे सांगितले.
पुढे त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या शिंदे गटावरच्या आरोपावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत (2 हजार कोटी बाबत) सांगतात ते खरच आहे. मी 50 खोके घेतले नाही अस एकही आमदार सांगत नाही. निवडणूक आयोगात पासवान यांच्या मुलाची केस पेंडींग आहे, अनेक केस पेंडींग असताना ही केस एवढ्या लवकर का लागते ? असा सवाल त्यांनी केला आहे. निवडणूक आयुक्ताच्या नेमणूकीवरही सुप्रीम कोर्टाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. असा संशय त्यांनी यावेळी व्यक्त केला.