विनायक राऊतांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, 50 खोके गद्दार बोके असतील
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे गटाची जिल्हा कार्यकारणी बैठक खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत भास्कर जाधव यांचे विनायक राऊत यांच्याकडून कौतूक करण्यात आले. सोबतच या बैठकीत बोलत असताना विनायक राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले विनायक राऊत?
50 खोके गद्दार बोके असतील त्या सर्वांना काढून टाकलं आहे. बेईमानाची पर्वा करू नका, पैसे कितीही टाकले तरी आता निवडणूक येवू शकणार नाहीत असा टोला उदय सामंत यांना लगावला. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे मंत्री महोदयांना क्लिन बोल्ड केलं आहे तोच प्लॅन पुढच्या निवडणुकीतही वापरायचा आहे असंही त्यांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले.
पुढे ते म्हणाले की, ऋतुजा लटके यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले. त्यावेळी ते म्हणाले की, आपला नारळ खणखणीत आहे. लोकांसाठी काम केलं म्हणूनच अंधेरी पोटनिवडणुकीत आपला विजय झाला आहे. प्रत्येक गोष्टीत उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात आहे. तरीही जी लोकं जोरदार टीका करतात त्यांना ते म्हणाले की, तुमच्या बारश्याच्या घुगऱ्या खाल्ल्या आहेत. असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
महाराष्ट्र कर्जबाजारी झाला असला तरीही शिंदे गट सगळे प्रकल्प गुजरात जाण्यासाठीच प्रयत्न करु लागले आहेत. उद्योग करायचे ते करा पण असे उद्योग का करतात, पांढऱ्या पायाच्या सरकारने उद्योग महाराष्ट्राबाहेर घालवले असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. भाजपा गद्दार पार्टी आणि मनसे आता सर्व एकवटताहेत. ते फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी. त्यांचा सर्वांचा एकत्र शत्रू उद्धव ठाकरे आहेत. मुंबई गुजराथला देवून टाकण्यासाठीच गद्दारांचा वापर केला जातो आहे असा जोरदार निशाणाही त्यांनी शिंदे सरकारवर साधला आहे.