Kokan
KokanTeam Lokshahi

शिमग्याक कोकणात जाणाऱ्यासाठी बातमी! कोकण रेल्वेकडून असणार तीन होळी स्पेशल रेल्वे गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, पुणे जंक्शन ते करमाळी, करमाळी ते पनवेल अशा या विशेष रेल्वे गाड्या असणार आहे.

चिपळूण|निसार शेख: शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यांच्यासाठी कोकण रेल्वेकडून तीन होळी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी या गाड्यांची घोषणा करण्यात आली.

कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून २६ फेब्रुवारी, ५ मार्च तसेच १२ मार्च या दिवशी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी मडगावला सकाळी १०.३० वाजता पोहोचेल. ही गाडी परतीच्या प्रवासात मडगाव येथून २७ फेब्रुवारी, ६ मार्च, १३ मार्च रोजी मडगाव येथून सकाळी साडेअकरा वाजता सुटून रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी तसेच करमाळी स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी १७ डब्यांची धावणार आहे.

दुसरी विशेष गाडी पुणे जंक्शन ते करमाळी दरम्यान धावणार आहे. ही गाडी पुणे येथून २४ फेब्रुवारी, ३ मार्च, १० मार्च व १७ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुटून गोव्यात करमाळीला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही साप्ताहिक गाडी करमाळी येथून २६ फेब्रुवारी, ५ मार्च, आणि १९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटून रात्री अकरा वाजून ३५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी लोणावळ, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी स्थानकांवर थांबणार आहे. एकूण २२ डब्यांची गाडी असेल.

तिसरी होळी विशेष गाडी करमाळी ते पनवेल मार्गावर धावणार आहे. ही गाडी २५ फेब्रुवारी, ४ मार्च ११ मार्च तसेच १८ मार्च रोजी करमाळी येथून सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ती सव्वा आठ वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २५ फेब्रुवारी, ४ मार्च, ११ मार्च तसेच १८ मार्च रोजी पनवेल येथून सुटून रात्री दहा वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर अडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com