ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उद्या राहुल गांधी झाले तरी आश्चर्य वाटणार नाही; कोण म्हणाले असं?
मुंबई : इंडिया आघाडीची मुंबईत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीवर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी सडकून टीका केली आहे. बाळासाहेबांनी ज्यांच्यावर टोकाची टिका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून हे लोक जाऊन बसलेत. मुंबईत पर्यटनाला आलेल्यांनी मोदींना टक्कर देण्याचं स्वप्न पाहू नये. हे सगळे मुंबई दर्शनाला आलेत. पण एकानंही बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन वंदन केलं का, असा सवाल सामंतांनी विचारला आहे.
इंडियाच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही. एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावाप्रमाणेच अजित दादांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय. चारा घोटाळ्यात ज्यांनी शेकडो खोके खाल्ले त्यांच्या बाजूला बसून काहीजण आमच्यावर खोक्यांचा आरोप करू नये. त्यांनी आज समन्वयक आणि पीए पदाचा उमेदवार जाहीर करावा. 25 आणि 26 नंबरवरच्या राज्यातील दोन पक्षांनी आपली जागा ओळखावी, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे
इंडियाचा लोगो अजून निश्चित नाही, नेता ठरलेला नाही. ज्यांच्या नावात डॉट आहेत ते कधीच एक होऊ शकत नाहीत. हे सगळेजण परिवारवादावर चालणारी मंडळी आहेत. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव या लोकांचाच आहे, असा पलटवारही त्यांनी केला आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या मनातही हा विचार नाही. हा केवळ निवडणूकीत मांडायचा नेहमीचा मुद्दा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उद्या राहुल गांधी झाले तरी आश्चर्य वाटणार नाही, असाही निशाणा त्यांनी साधला आहे.