Eknath Shinde | Uddhav Thackeray
Eknath Shinde | Uddhav ThackerayTeam Lokshahi

निष्ठेच्या पांघरुणाखाली काही लांडगे घुसले होते ते विकले गेले; उध्दव ठाकरेंचा घणाघात

उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाचा घेतला खरपूस समाचार

ठाणे : राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षाचा खरपूस समाचार घेतला. आता आपण फक्त खासदारांनी लावलेल्या आरोग्य शिबिर आणि इतर कार्यक्रमांसाठी आलो आहे. आज मी नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी आलो आहे. भविष्यात ठाणे जिल्ह्याच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
दावोस, कॉंक्रीट रस्ते, धनुष्यबाण कोणाचा अन्..., मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका

राज्यात सुरु असलेले राजकीय डावपेच आणि सत्तांतर यानंतर शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आज प्रथमच ठाण्यात शिवसैनिकांच्या भेटीसाठी आले होते. ठाण्यात ठाकरे गटाकडून आणि धार्मिक संस्थांकडून आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांसाठी आज उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी ठाण्यातील तलावपाळी येथील शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महाशिबिराला भेट दिली.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय घडामोडींचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका गोष्टीचं समाधान आहे, सध्या जो काय विकृत्त आणि गलिच्छपणा राजकारणात आलेला आहे तो समोर दिसत असताना देखील शिवसेना आपल्या मुळ हेतुपसून दूर गेलेली नाही याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे. या शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिकवलं आहे की ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण. त्यामुळे आज जेवढे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहे ते सगळे ठाकरे गटात माझ्यासोबत आहेत. बाकी सगळे विकाऊ विकले गेले आणि ते काय भावात विकले गेले ते सगळ्यांनाच माहिती असल्याचा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत संजय राऊत यांनी देखील मागील आठवड्यात सहभाग घेतला होता. तेथून आल्यावर संजय राऊत यांनी मला व्हिडिओ दाखवून काश्मीरमध्ये देखील ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा गेल्या आहेत. निष्ठेच्या पांघरुणाखाली काही लांडगे घुसले होते ते विकले गेले. ही शिवसेनेची आणि महाराष्ट्राची बदनामी असल्याची खंत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे गेले त्यांना जाऊ द्या त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाही. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेना आणि माझ्यासोबत राहिले आहेत. तेच निखारे उद्या राजकारणात मशाल पेटवणार, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आरोग्य शिबिरासाठी जे काही डॉक्टर आहेत त्यांचा प्रतीकात्मक गौरव केला आहे. त्यांच्या टीमचे आभार मानतो आरोग्यविषय किती गंभीर आहे त्याची कल्पना कुणाला सांगायला नको. मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष विचित्र जबाबदारी आणि जागतिक संकट आलं होतं. त्यावेळी सगळ्यांनी सहकार्य केलं खासकरून डॉक्टरांनी सहकार्य केलं. सगळ्या धर्माच्या लोकांनी सहकार्य केलं. डॉक्टर आणि पोलिस हे देवाच्या रुपात आपला प्राण वाचवायला उभे राहिले होते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Eknath Shinde | Uddhav Thackeray
'नमस्कार, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री लोकशाहीच्या विशेष बातमीपत्रात स्वागत करतो'

कोविड काळात जितेंद्र आव्हाड हे पहिल्या बॅचचे होते. ते वरती जाऊन घंटा वाजवून आले होते त्यांना डॉक्टरांनी वाचवलं. आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या घाणीमध्ये पाऊल न टाकता शिवसेना प्रमुखांनी दिलेलं काम हे निष्ठेने करत राहिलात. यालाच म्हणतात शिवसैनिक अस उद्धव ठाकरे म्हणाले. यासाठी खासदार राजन विचारे आणि सगळ्या सहकाऱ्यांचे उद्धव ठाकरे यांनी मनापासून कौतुक केलं. आज आपण विविध कार्यक्रमासाठी आलो आहे. यावेळी जरी आपण राजकारणावर जास्त बोलण्यासाठी ठाण्यात आलो नसलो. तरी येणाऱ्या काळात ठाण्यामध्ये लवकरच एक प्रचंड अशी जाहीर सभा घेणार असल्याचे बिगुल उद्धव ठाकरे यांनी फुंकले आहे.

सत्तांतरनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच ठाण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी त्याचे जंगी स्वागत केले. भव्य अशी बाईक रॅली काढून उद्धव ठाकरे यांचा दौरा पार पाडण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या महाआरोग्य शिबिराला भेट दिली असून त्यानंतर उद्धव ठाकरे हे टेंभी नाका येथील शिवसेनेचे दिवंगत नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जैन मंदिर येथे धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com