उद्धव ठाकरेंना पंजाब, हिमाचल प्रदेशच्या शिवसैनिकांचा पाठींबा, मातोश्रीवर घेतली भेट
राज्यात सध्या राजकिय घडामोडींना वेग येत आहे. अशातच शिवसेना नक्की कोणाची याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. शिवसेना आपली सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. दोन्ही गट जोरदार सभा या वेळी घेत आहेत. दुसरीकडे मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला थेट पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील शिवसैनिकांकडून पाठिंबा मिळाला आहे. या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मदत म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सहभाग घेणार आहेत.
पंजाब शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा मातोश्रीवर दाखल
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पंजाब शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज मुंबईत दाखल झाले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत असण्याची ग्वाही दिली.
सोबतच शर्मा म्हणाले की, आम्ही हजारो शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फॉर्म देणार. पंजाब आणि हिमाचल प्रदेशात बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे अनेक लोक आहेत. शिवसेना सोडलेल्या आमदारांची शिवसेनेला पर्वा नाही. यांनी शिवसेना सोडली असली तरी शिवसेना मजबूत झाली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मुंबईत राहणाऱ्या पंजाबी आणि हिमाचल प्रदेशातील नागरीकांशी संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेनेत सहभागी होण्याचे आवाहन हे पदाधिकारी करणार आहेत.