राज्याचा अपमान केला जातोय; उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा, मग महाराष्ट्र बंद असो...

राज्याचा अपमान केला जातोय; उध्दव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा, मग महाराष्ट्र बंद असो...

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा समाचार घेतला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा समाचार घेतला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकास्त्र सोडले आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना दाखवला पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचाय किंवा मोर्चा काढायचा. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना केले आहे.

उध्दव ठाकरे म्हणाले की, मिंधे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची सातत्याने अवेलहना होत आहे. उद्योग पळविणे, महाष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा अंगात भूत संचारले आहे. जणू काही महाराष्ट्रात माणसे राहतच नाही. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाहीये. कोणी यावे आणि टपली मारावी आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून नुसतेच गप्प बसायचे हे आतापर्यंत खूप झाले.

महाराष्ट्रात खोके सरकार आहे. या सरकारला मुख्यमंत्री आहेत कि नाही माहित नाही. मुख्यमंत्री कधी बोलतच नाही त्यांना विचारले तर काळजी करु नका पंतप्रधानांना सांगितलेले आहे. पंतप्रधान म्हणाले, त्यांनी 40 गावे घतली तर द्या आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर महाराष्ट्राला देऊ, असेही ते कदाचित सांगू शकतील. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

उपमुख्यमंत्री नेहमीप्रमाणे सारावासारव करत आहेत. मुख्यमंत्री हे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलू शकत का, असा प्रश्न उध्दव ठाकरेंनी विचारला आहे. याचाच अर्थ बोम्मई जे काय बोलले हे वरिष्ठांच्या मर्जीशिवाय बोलले का? म्हणजेच भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे उद्योग इतरत्र नेऊन महाराष्ट्र कंगाल करण्याचे सुरु आहे. हा त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का याचे त्यांनी उत्तर दिले पाहिजे.

आता वेळ आलेली आहे या महाराष्ट्राद्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्राप्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे. आणि या 2-3 दिवसांत हे असेच चालत राहीले तर आपल्या डोळ्यांदेखत आपल हे शूरवीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याची अब्रुची लख्तरे वेशीवर टांगली जातील. आणि आपल्याला केवळ बघत बसायला लागेल. आताच वेळ आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्रद्रोह्यांना दाखवला पाहिजे. मग त्याला महाराष्ट्र बंद करायचाय किंवा मोर्चा काढायचा. पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता चिरडली जाणार असेल तर आपण छत्रपतींचे नाव घ्यायला नालायक आहोत. म्हणून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन उध्दव ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना केले आहे. आम्हाला आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसता येणार नाही, शिवसेनेला पाहिजे ते शिवसेना करणारच आहे. केंद्र सराकारला कळल पाहिजे महाराष्ट्र हा लेचापेचांचा प्रदेश नाहीये, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com