दादा तुम्ही वाघ, हत्ती का सिंह! एकदा दाखवूनचं द्या; वडेट्टीवारांची खोचक टीका
अनिल ठाकरे | चंद्रपूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लबाड लांडग्याचं पिल्लू, असा उल्लेख पडळकर यांनी उल्लेख केला होता. यावरुन आता राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. दादा तुम्ही वाघ आहात की हत्ती आहेत की सिंह एकदा दाखवूनचं द्या, असे थेट आव्हानच वडेट्टीवारांनी दिले आहे.
सत्तेसाठी किती ही लाचारी. अजित दादा हे तसे वाघ माणूस. ज्या पक्षासोबत जाऊन सत्तेत आले. त्या पक्षातला माणूस त्यांना लांडगा म्हणतो. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. दादा तुम्ही वाघ आहात की हत्ती आहात की सिंह एकदा दाखवूनचं द्या, सत्तेसाठी मी लाचार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्याच अशी आम्हाला अजित पवारांकडून अपेक्षा आहे, अशी बोचरी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
महिला आरक्षणाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, नव्या संसदेत नवीन जुमला. महिला आरक्षणासंदर्भात लोकसभा आणि विधानसभेसाठी जे विधेयक आणलं गेलं. फार गाजावाजा केला गेला उदो उदो झाला. सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या निर्णय घेतला. महिलांना वाटलं येणाऱ्या निवडणुकीत आमच्या प्रतिनिधित्व वाढेल. महिलांचं सक्षमीकरण होईल. मात्र, एका नव्या जुमल्याला देशाला समोर जावं लागलं. ही भूमिका मतांवर डोळा ठेवून घेतलेली आहे, अशीही टीका त्यांनी मोदी सरकारवर केली.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?
धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हंटले होते.