विजय वडेट्टीवारांनी केले महत्वपूर्ण विधान, असे  होणार जागावाटप

विजय वडेट्टीवारांनी केले महत्वपूर्ण विधान, असे होणार जागावाटप

महाविकास आघाडीत निवडणुकीच्या जागावाटपावरुन सध्या चर्चा सुरु आहेत.

मुंबई : महाविकास आघाडीत निवडणुकीच्या जागावाटपावरुन सध्या चर्चा सुरु आहेत. अशात, मविआतील अनेक नेते जास्त जागांवर दावे करत आहेत. तर, लहान भाऊ मोठा भाऊ यावरुन चर्चाही रंगली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे.

लहान भाऊ मोठा भाऊ या वादात आम्हाला पडायचं नाही. पहिले तिन्ही भावांनी मिळून शेती चांगली करू. उत्तम नांगरणी करुन पीक चांगलं येईल यासाठी आधी प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतीचा हंगाम चांगला करण्यासाठी चांगलं काम करून पीक आल्यावर कशी वाटणी करावी हे ठरवू, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.

तर, आदित्य ठाकरे यांचे नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले पोस्टर लागले आहे. त्यामुळे आता चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरही विजय वडेट्टीवारांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असेल तरी जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सदरी हा फॉर्म्युला आहे. समर्थकांना बॅनर लावण्याचा अधिकार आहे. आपला नेता मोठा व्हावा ही भावना असते त्यामुळे बॅनर लावतात, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली असून आज ते चौकशीला सामोरे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, ईडीने कोणाला त्रास देऊ नये. अनेक नोटीस राजकारणाने प्रेरित असतात. या यंत्रणा केंद्राच्या दबावाखाली काम करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com