दीड हजार जेवणाची प्लेट, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; वडेट्टीवारांनी यादीच केली जाहीर
मुंबई : मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगली पाहिजे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
सरकारने जनाची नाहीतर मनाची लाज बाळगली पाहिजे. मराठवाड्यात कॅबिनेटसाठी येतात की पर्यटनसाठी येत आहेत, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी सरकारला केला आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत शेतकरी त्रस्त आहे. १९६ तालुके दुष्काळ छायेत आहेत. हे सरकार फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट का घेत आहेत? याआधी कॅबिनेट बैठक झाल्या तेव्हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण असताना फाईव्ह स्टार हॉटेलचा पाहुणचार घेतला नव्हता. शासकीय विश्रामगृहात थांबले होते, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
दीड हजार जेवणाची प्लेट, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, असे म्हणत फडणवीस यांनी २०१६ ला ५० हजार ६०० कोटी पॅकेजचे काय झाले? नव्याने तोंडाला पान पुसायला जात असतील तर जनता माफ करणार नाही. सरकारने सुधारावे आणि जमिनीवर पाय ठेवावे, असा सल्लादेखील वडेट्टीवारांनी दिला आहे. राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. सोबतच विजय वडेट्टीवारांनी मंत्रिमंडळ बैठकांचा रेटकार्डच ट्विटरवर पोस्ट केलेले आहे.
फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)
ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव)
अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे - 20 ( इतर अधिकारी)
एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे, असे ट्विट वडेट्टीवारांनी केले आहे.