Raj Thackeray: मोदींना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम आहे; मग आपल्याला का नाही?

Raj Thackeray: मोदींना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम आहे; मग आपल्याला का नाही?

आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या संमेलनात राज ठाकरे म्हणाले की, आपल्याच महाराष्ट्रात गेले अनेक वर्ष मराठी या विषयावर मी बोलत आलोय. मराठी या विषयावर अंगावर केसेस घेत आलो. मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो. मी एक कडवट मराठी माणूस आहे आणि माझ्यावर संस्कार त्या प्रकारचे झाले आहेत. आजोबांचे पुस्तकरुपात झाले. बाळासाहेंबांचे, माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले आणि महाराष्ट्र ही काय ताकद आहे, हे जशीजशी मला समजत गेलं, तसा मी जास्तीत जास्त त्याच्या प्रेमात पडायला लागलो. जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंडळानं आमंत्रित केलं आहे. मला त्याचे अध्यक्ष आता इथे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे अमेरिकेत 100 शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होतात, हे काही कमी आहे का?"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं की आपण पहिले महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरात मराठी माणूस पसरलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. जेवढा महाराष्ट्राचा विचार इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा नेता येईल पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत, हे सांगता येईल हे उत्तम. परंतू महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रांच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून कानावर हिंदी भाषा यायला लागते त्यावेळी त्रास व्हायला लागतो. भाषेला विरोध नाही, भाषा उत्तम. पण 'हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे', जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, जशी तेलगु भाषा आहे, जशी गुजराती भाषा आहे, जशी इतर भाषा आहेत, तशीच हिंदी ही सुद्धा एक भाषा आहे. या देशांमध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झाला नाही, राष्ट्रभाषा म्हणून कोणतीही भाषा नेमली गेलीच नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयासाठी इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषा ठेवल्या. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे, हे जेव्हा पहिल्यांदा मी बोललो, त्यावेळी अनेकजण माझ्या अंगावर आले. जेव्हा ते अंगावर आले तेव्हा गुजरात हायकोर्टाचा कागद त्यांच्यासमोर ठेवला.

"आजही तुम्ही गुगुलवर गेलात, तर तुमच्या लक्षात येईल हिंदी आपली राष्ट्रभाषा नव्हे, भाषा उत्तम असली तरीही. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले, हिंदी चित्रपटांमधून आमच्या अंगावर हिंदी आली. पण बोलताना मराठी लोक हिंदी का वापरतात? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरं तर मराठी भाषेत जो विनोद होतो, तो मला नाही वाटत इतर दुसऱ्या भाषेत होत असेल, इतकी समृद्ध आपली भाषा आहे. पण आजी ही भाषा घालवण्याचा, बाजूला सारण्याचा ज्या प्रकाराचा राजकीय प्रयत्न होतोय, ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात जाते.

दीपकजींना माझी विनंती आहे की, मराठी शाळा सोडून महाराष्ट्रामध्ये जेवढे शाळा आहेत ते काय नवं लचांड आलंय, सीबीएसई काय काय गोष्टी आल्या आहेत नवीन त्या शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा अनिर्वाय करा. मला समजत नाही, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, अमराठी असतील लोकं जिथे तुमची मुलं झाली, त्या मुलांना तुमच्या शाळेत काय शिकवलं जातं जर्मन, फ्रेंच की जणू काय ते देश बोलवत आहे यांना की या मुलांनो आमची लोकसंख्या वाढवा. जी भाषा शिकायची आहे ती भाषा शिका पण जिथे राहाताय तिथली स्थानिक मातृभाषा तर शिका पहिली आणि यात कमीपणा कसला आला.", असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

मराठीबाबत बोलल्यानंतर तुम्ही म्हणणार संकुचित आहे, पण कशासाठी संकुचितपणा? या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या देशाबाबत वाटतं, त्यांच्या राज्याबाबत वाटतं. जगातील सर्वात मोठा पुतळा कुठे बांधावा? तर पंतप्रधानांना वाटतो गुजरातमध्ये बांधावासा. आमच्या पंतप्रधानांना वाटतंय की गिफ्ट सिटी गुजरातमध्ये बांधावी, महाराष्ट्रात नको, तमिळनाडूमध्ये नको, बंगालमध्ये नको अजून कुठे नको. हिऱ्यांचा व्यापारही पंतप्रधानांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतोय, न्यावा त्यांनी. मला असं म्हणायचंय, देशाच्या पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबाबतचं प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही आम्ही का लपवतोय?"

आता अनेकांना वाटेल राज ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केली. पण टीका नाही ही, जो मूळ माणूस आहे, त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबाबत, भाषेबाबत आणि माणसांबाबत प्रेम आहे, मग तुम्ही का लपवताय? ज्या राज्यात मी राहतो, त्या राज्यातला मराठी माणूस घर घ्यायला जातो आणि तिथल्या एका जैन सोसायटीमधला माणूस सांगतो, आम्ही तुम्हाला घर देणार नाही, तेव्हा काय करायचं आम्ही? देशातल्या इतर राज्यांमध्ये करुन दाखवा की, तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असूनही.. असं महाराष्ट्रातच का होतं? कारण आमचं बोटचेपे धोरण... आम्हीच पहिले मागे हटतो. नसेल जागा त्याच्याकडे जाऊ दे ना आता काय करणार दुसरीकडे बघ ना कशासाठी? जागा असताना, परवडत आसताना कोण म्हणतं मराठी माणसाकडे पैसे नाहीत? जे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाही, ते सांगतात मराठी माणसाकडे पैसे नाहीत, एकदा महाराष्ट्र फिरुन बघा, मराठी माणसं कुठे पोहोचलीत.", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com