Lok Sabha Election 2024: विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान; महायुती विरुद्ध आघाडी लढत

Lok Sabha Election 2024: विदर्भातील पाच मतदारसंघात आज मतदान; महायुती विरुद्ध आघाडी लढत

आज म्हणजेच ( १९ एप्रिल) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात होणार असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल.
Published by :
Dhanshree Shintre

आज म्हणजेच ( १९ एप्रिल) देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरूवात होणार असून महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी थेट लढत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आजपासून मतदानास सुरूवात होणार असून पहिल्या टप्प्यात राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर मतदान होईल.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज होणाऱ्या 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 102 मतदारसंघांमधील प्रचाराची बुधवारी संध्याकाळी सांगता झाली. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांच्या 'इंडिया'च्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या पाचही मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे.

2019 च्या निवडणुकीत पाचपैकी चार जागा भाजप-शिवसेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ताकदीचे उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच वाहिली. गेल्या काही दिवसांत मोदी यांनी अनेक मतदारसंघांमध्ये झंझावाती प्रचारदौरे केले. अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या, रोड-शो केले. मोदी यांनी प्रत्येक सभेत, मतदारांना 'मोदी गॅरंटी'चे आश्वासन दिले. "सर्व हमींची पूर्तता करण्याचीही मी हमी देत आहे," याचा पंतप्रधानांनी जवळपास प्रत्येक सभेत पुनरुच्चार केला. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मंत्रिमंडळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी राओलाच्या उमेदवारांचा प्रचार केला. तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार प्रामुख्याने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांनी केला.

पूर्व विदर्भात महायुती विरुद्ध मविआ

● नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे (काँग्रेस) विकास ठाकरे.

● रामटेक: शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे.

● चंद्रपूर: राज्याचे वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर.

● गडचिरोली: महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान.

● भंडारा-गोंदिया: भाजपचे विद्यामान खासदार सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com