भरत गोगावलेंना 'त्या' पुडीतून काय दिलं? शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितले
मुंबई : राज्याचे अधिवेशन संपण्यास अवघा एकच दिवस बाकी राहिला आहे. यादरम्यान अनेक नेते वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले. यातच शंभूराज देसाई आणि भरत गोगावलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना देसाई एक पुडी गोगावलेंकडे देताना दिसले. या पुडीमध्ये नेमके काय? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित करत शिंदे गटावर टीकास्त्र सोडले होते. यावर आता शंभूराज देसाईंनी स्पष्टीकरण दिले आहे.
शंभूराज देसाई म्हणाले की, या संदर्भात मी सोशल मीडियावर एक क्लिप पहिली. भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली होती. मी मसाला इलायची नेहमीच सोबत ठेवतो. ती इलायची मी भरत गोगावले यांना दिली, असा खुलासा त्यांनी दिला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सभागृहात बोलतात. पण, ठाकरे गटाचे जे काही आमदार उरलेले आहेत व जे युवा नेते आहेत त्यांनी नको त्या विषयावर बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलावे. कारण मी आयुष्यात कधीच तंबाखू खाला नाही. हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे, असा निशाणाही शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंवर साधला आहे.
नेमके काय घडले सभागृहात?
एकनाथ शिंदे सभागृहात बोलत असताना भरत गोगावले यांनी शंभूराज देसाई यांच्याकडे पुडी मागितली. गोगावलेंनी तंबाखू मळण्याची खूण करुन त्यांच्याकडे पुडी मागितली. याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे. यावरुन आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली होती. सभागृहात जे कायदे आहेत त्याचं पालन होत नाही आहे. यावर कारवाई होणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हंटले होते.