संजय शिरसाट पुन्हा ठाकरे गटाकडे जाणार?  'कुटुंबप्रमुख' म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ ट्वीट

संजय शिरसाट पुन्हा ठाकरे गटाकडे जाणार? 'कुटुंबप्रमुख' म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ ट्वीट

संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. परंतु,पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा

मुंबई : आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. परंतु, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याचे दिसत आहे. अशातच संजय शिरसाटांनी ट्विटवर उध्दव ठाकरेंचा व्हिडीओ शेअर केला आहे. तर, यात उध्दव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे. यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात आहेत.

संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उध्दव ठाकरे यांचा कुटुंबप्रमुख म्हणत एक व्हिडीओ ट्विट केला. परंतु, हा ट्विट केलेला व्हिडीओ काही क्षणातच शिरसाट यांनी डिलीट केला. . तसेच, त्यांच्या ट्विटरच्या प्रोफाईल फोटोवरही उध्दव ठाकरेंचा फोटो दिसला होता. यामुळे शिंदे गटातील संजय शिरसाट यांच्या ट्विटमुळे राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. यामुळे संजय शिरसाट पुन्हा ठाकरे गटाकडे जाणार, अशा चर्चांना ऊत आला आहे. तर, एकीकडे संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने दबावतंत्र निर्माण करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

परंतु, संजय शिरसाटांनी या चर्चांना पूर्णविराम लावला असून आम्ही आजही शिवसेनेत आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नव्हती. आमची भूमिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

एखाद्यावर विश्वास ठेवला तर मान कापली गेली तरी हरकत नाही. मंत्रिपदासाठी मी भूकेलेला नाही. ज्या ठिकाणी चुकतं त्यावेळी बोलायला हवं. मला जे योग्य वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो. मंत्रिपद मिळालं किंवा नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधीच येणार नाही, असेही शिरसाट यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com