दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची कोंडी करणार? शिंदे-फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेची कोंडी करणार? शिंदे-फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन

दसरा मेळाव्यासाठी शिंदे-फडणवीसांकडून शिवसेनेची कोंडी

मुंबई : दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिवसेना शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहे. अशात शिंदे-फडणवीसांकडून शिवसेनेची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. यासाठी शिंदे सरकारने मास्टर प्लॅन केल्याचीही माहिती मिळत आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. परंतु, सुरक्षेचे कारण पालिकेने पुढे केले आहे. यामुळे पर्याय म्हणून शिंदे गटाला बीकेसीच्या मैदानाची परवानगी दिली आहे. परंतु, शिवसेनेचा परवानगी अर्ज अद्यापही प्रलंबित असून पालिकेना होकार अथवा नकार दिलेला नाही. यामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण आहे. तरीही शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार असल्याची घोषणा केली आहे. तर, संजय राऊत यांनीही परवानगी मिळो अथवा न मिळो शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेण्याची प्रतिक्रिया दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेला रोखण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे.

मुंबई महानगरपालिकेवर शिंदे सरकारचा दबाव असल्याचे अनेक आरोप करण्यात आले आहेत. यातून बचावासाठी शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी बीकेसीचे मैदान देण्यात आले आहेत. व शिवाजी पार्कच्या मैदानाची परवानगी रोखून धरण्यात आली आहे. यामुळे शिनसेना मैदानापासून वंचित झाली आहे. तरीही शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे. यावर जबरदस्तीने मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचा इशारा शिंदे सरकारने शिवसेनेला दिला आहे. तसे आदेशही पोलिसांना दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

दरम्यान, शिवसेनेचे शिष्टमंडळ आज महापालिकेत जाणार आहे. दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही तर शिवसेनेसमोर कोणते पर्याय आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उच्च न्यायालयात धाव घेऊ शकते. अथवा राज्य सरकारविरोधात बंड करुन शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेऊ शकते. तर, दुसरीकडे, परवानगी नाकारली तरी उच्च न्यायालयाचे दार ठोठावतानाच शिवसेना भवनाच्या गडकरी चौकात गाडी लावून शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्याचे भाषण करतील. तशी तयारी शिवसेनेने सुरु केल्याचे समजते आहे.

Lokshahi
www.lokshahi.com