‘किळस’वाण्या सोमय्यांची चौकशी करावी; यशोमती ठाकूर यांची मागणी, लोकशाही चॅनेलच्या पाठी सर्वांनी राहीलं पाहिजे

‘किळस’वाण्या सोमय्यांची चौकशी करावी; यशोमती ठाकूर यांची मागणी, लोकशाही चॅनेलच्या पाठी सर्वांनी राहीलं पाहिजे

भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला असून सोमय्यांवर शरसंधान साधले आहे.

सूरज दहाट | अमरावती : भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला असून सोमय्यांवर शरसंधान साधले आहे. ‘किळस’वाण्या सोमय्यांची चौकशी झालीच पाहिजे, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी लोकशाही चॅनेलच्या पाठी सर्वांनी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीनं भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सर्वांसमोर आणल्याबद्दल त्यांचे आभार. अनेक नेत्यांवर तथ्यहीन आरोप करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं सर्वांसमोर आला. आता या चॅनेलच्या पाठिशी राहणं ही लोकशाही मानणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे. नाहीतर या चॅनेलवरही ईडी, सीबीआय सारख्या संस्थांच्या धाडी पाडल्या जातील किंवा मागच्या दारातून हे चॅनेलही विकत घेतलं जाईलही. मात्र, कोंबडं झाकून ठेवलं तरी आरवायचं राहत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला गेला तरी भाजपमधले ‘किळस’वाणे सोमय्या बाहेर येतच राहणार, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे.

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com