Mahadevi Elephant : महादेवी माधुरी हत्तीणीसाठी राज्य शासनाची पुढाकाराची भूमिका, सर्वोच्च न्यायालयात होणार पुनर्विचार
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठात गेली 34 वर्षे वास्तव्य करत असलेल्या माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या पुनर्प्रत्यावर्तनासाठी राज्य शासनाने स्पष्टपणे पुढाकाराची भूमिका घेतली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितले की, "नांदणी मठाच्या परंपरा आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता, माधुरी हत्तीण पुन्हा मठात यावी ही लोकांची ठाम भावना आहे. त्यामुळे राज्य शासन स्वतः सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करेल आणि नांदणी मठानेही आपली याचिका सादर करताना राज्य शासनाचा समावेश करावा."
राज्य शासनाकडून स्वतंत्र भूमिका मांडली जाणार
या याचिकेमध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या निकषांनुसार आणि उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींचा समावेश केला जाणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयास एक स्वतंत्र समिती नेमण्याची विनंतीही करण्यात येणार असून, ती समिती या प्रकरणाची सखोल तपासणी करेल.
हत्तीणीच्या देखभालीसाठी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली पथक
हत्तीणीच्या आरोग्य आणि निगेची जबाबदारी राज्य शासन घेणार असून, तज्ञ डॉक्टरांसह एक पथक तयार करण्यात येईल. याशिवाय, आवश्यक वाटल्यास रेस्क्यू सेंटरसारखी सुविधा तयार केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जे हत्ती अन्य राज्यांत किंवा ठिकाणी हलविण्यात आले आहेत, त्यांची संपूर्ण माहिती गोळा करण्याचे आदेश वन विभागाला दिले.
बैठकीला उपस्थित मान्यवर
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, तसेच खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी (नांदणी मठ), ललित गांधी (जैन अल्पसंख्याक विकास महामंडळ अध्यक्ष), अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत येण्याच्या आशा बळावल्या आहेत. जनतेच्या भावना, परंपरा, आणि कायदेशीर प्रक्रिया यांचा समतोल राखत पुढील कायदेशीर लढ्याची दिशा ठरवली जाणार आहे.