Beed Crime : आई वडिलांना मेसेज आणि...; अभ्यासाच्या ताणामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
देशातील एक अत्यंत दुर्दैवी आणि अंतर्मुख करणारी घटना सोमवारी वानवडीतील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (AFMC) परिसरात उघडकीस आली. भोपाळमधील AIIMS मध्ये शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय उत्कर्ष महादेव शिंगणे या गुणवान विद्यार्थ्याने अभ्यासाच्या ताणातून व नैराश्यातून स्वतःच्या छातीत चाकूने भोसकून आत्महत्या केली.
आई-वडिलांना सुसाइड नोट पाठवली :
आत्महत्येपूर्वी उत्कर्षने आपल्या आई-वडिलांना व्हॉट्सअॅपवर एक सुसाइड नोट पाठवली होती. ज्यामध्ये त्याने म्हटले की, "मी आत्महत्या करत आहे. मी शिक्षणमंत्र्यांना विनंती करतो की, अभ्यासक्रमात मुघल, फ्रेंच, रशियन इतिहासाऐवजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात यावा." या एका वाक्यातून उत्कर्षची मानसिक अवस्था, त्याचे विचारविश्व आणि इतिहासाविषयीची असलेली अस्मिता प्रकर्षाने समोर येते.
AFMCच्या वसतिगृहात मृत्यू
आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी ८ मे रोजी पुण्यात आलेला उत्कर्ष AFMCच्या वसतिगृहात राहात होता. सोमवारी पहाटे त्याने प्रसाधनगृहात स्वतःच्या छातीत चाकू खुपसून आयुष्य संपवले. वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत उत्कर्षने प्राण सोडले होते. त्याने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाइन खरेदी केला होता, हे तपासात निष्पन्न झाले आहे.
मानसिक ताण घातक ठरला
उत्कर्ष हा अत्यंत बुहुशार विद्यार्थी होता. त्याने ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी तब्बल ७१० गुण मिळवले होते. त्याचे वडील डॉक्टर असून, त्याच्या आईने वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. लातूरमध्ये ‘नीट’ची तयारी करत असताना त्याच्या आईने त्याच्याजवळ राहून त्याला मानसिक आधार दिला होता. मात्र, AIIMSसारख्या उच्च संस्थेतील स्पर्धा, अभ्यासाचा ताण, आणि नैराश्य या साऱ्या गोष्टी त्याच्यावर इतक्या गडद झाल्या की अखेर त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
घटनेची माहिती मिळताच उत्कर्षचे पालक तातडीने पुण्याकडे रवाना झाले. त्यांच्या या अपार दुःखाला शब्द अपुरे ठरतील. वैद्यकीय क्षेत्रातील संधी आणि संघर्ष यांचा समतोल राखणे आजच्या विद्यार्थ्यांसाठी किती कठीण झाले आहे, याचे हे विदारक उदाहरण आहे.