Nana Patole
Nana Patole

दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला तातडीने मदत करा; नाना पटोलेंनी राज्यपालांकडे केली मोठी मागणी

शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला एकरी ५० हजार रुपये तसेच फळबागांना एकरी १ लाख रुपये मदत तातडीने करावी, अशीही मागणी नाना पटोली यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
Published by :

विनोद राठोड, प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील जनतेला दुष्काळाचे चटके बसतात. त्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. पण सत्ताधारी पक्ष निवडणुका व राजकीय साठमारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. सरकारचे दुष्काळाकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी या प्रश्नांकडे लक्ष देऊन जनतेला मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला एकरी ५० हजार रुपये तसेच फळबागांना एकरी १ लाख रुपये मदत तातडीने करावी. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात. पिण्याच्या पाण्याची सोय करावी. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे, यासाठी राज्यपाल बैस यांनी राज्य सरकारला निर्देश द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षाने राज्यपाल रमेश बैस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटलंय की, राज्यातील जनता सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. जवळपास १० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहेत. आजही हजारो वाड्या-वस्ता पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांपासून वंचित आहेत. शेतकरी संकटात आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिनींना पायपीट करावी लागत आहे. धरणामधील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. मुंबईसह अनेक शहराच्या पाणीपुरवण्यातही कपात केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट आहे. शेतीला पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे वर्षानुवर्षे सांभाळलेल्या फळबागा वाळून गेल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. संपूर्ण राज्यातील जनता अत्यंत अडचणींचा सामना करत आहे. दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. पण राज्य सरकार मात्र अजगरासारखे सुस्त पडून आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असतानाही सत्ताधारी पक्ष त्याकडे फारसे गांभिर्याने पाहत नाही, हे अत्यंत दुर्देवी आहे. राज्य सरकारने केवळ आढावा बैठक घेण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक पालकमंत्री गैरहजर होते, त्यामुळे सरकारला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही हे स्पष्ट झाले आहे.

संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संसद भवन परिसरातील पुतळे केंद्र सरकारने हटवले आहेत, हे अत्यंत दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. सरकारने तात्काळ हे पुतळे पुर्नस्थापीत करावेत अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालामध्ये मोठ्या प्रमाणात अनिमियतता आणि गैरप्रकार झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. त्याचा हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होणार आहे. विद्यापीठाचे ईआरपी पोर्टल ४ महिन्यांपासून बंद आहे, विद्यार्थी या ग्रेड सिस्टममधील गुण ओळखू शकत नाहीत.

तसेच ते नोकरी, शिष्यवृत्ती किंवा पुढील अभ्यासासाठी अर्ज करू शकत नाहीत. १०० पेक्षा जास्त दिवस उलटूनही अंतिम वर्ष आणि पुरवणी परीक्षेचे निकाल पूर्णपणे जाहीर केलेले नाहीत, ज्यामुळे विद्यार्थी चिंता आणि नैराश्याचे कारण बनले आहेत. त्यापैकी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. विद्यार्थी दिलेल्या गुणांबाबत असमाधानी आहेत आणि विद्यापीठाने ज्या पद्धतीने पेपर तपासणी प्रक्रिया केली आहे, त्यात गैरप्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com