सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधात आज महाराष्ट्र विधीमंडळात ठराव मांडणार

सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारविरोधात आज महाराष्ट्र विधीमंडळात ठराव मांडणार

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला जाणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन काल (26 डिसेंबर) विधानसभेत विरोधकांनी महाराष्ट्र सरकारने अजूनही कर्नाटक सरकारविरोधात ठराव न मांडल्याने विरोधकांनी टीका केली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात म्हणाले की, आज ठराव मांडायला हवा होता. त्यावर आज किंवा उद्या ठराव मांडला जाईल, असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

कर्नाटकच्या विधीमंडळात 22 डिसेंबर रोजी महाराष्ट्रच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मांडलेला ठराव कर्नाटकच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. महाराष्ट्राला एकही इंचही जागा न देण्याचा ठराव मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकाच्या विधिमंडळात मांडला होता. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.

वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला गेले होते. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, "आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत. असे ते म्हणाले. तसेच फडणवीस म्हणाले की, "मागील आठवड्यात वातावरण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते आज दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. या संदर्भात महाराष्ट्र सरकार तसूभरही मागे हटणार नाही. आपण इंच इंच जागेचा विचार करु. सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्र सरकारसमोर आपण सीमावर्ती भागातील नागरिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी जे करायचं असेल ते करु," असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com