सीमावादावर अमित शाहांनी कोणती गुरुकिल्ली दिली? महाराष्ट्र-कर्नाटक सीमांवर आता शांतता नांदणार?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सहा दशकांपासून दोन्ही राज्यांना सतावतोय. यावर सर्वोच्च न्यायालयात तोडगा निघणार आहे. मात्र, यानिमित्ताने केवळ राजकीय वादातून दोन्ही राज्यांतील राजकारण तापलं होतं. या पार्श्वभूमीवर आज एक अभूतपूर्व घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत बैठक झाली. यातून दोन्ही राज्यात सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल, असे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिलेत.
देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकत्रित चर्चा केली. दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाल्यानंतर गाड्या फोडण्याची प्रकार, तसेच गाड्यांना काळे फासण्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे अमित शाहांच्या बैठकीत नक्की काय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. यावेळी अमित शाहांनी एक बाब स्पष्ट केली की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, आणि त्यावर संविधनिक निर्णय लागेल. तोपर्यंत दोन्ही राज्यांनी आपापसात समन्वय राखायचा आणि कुणीही कुणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नये.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दोन्ही राज्यांना तीन - तीन सदस्यांनी समिती बनवण्यास सांगितले. ही समिती दोन्ही राज्यात समन्वय साधेल, असंही स्पष्ट केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीवर समाधान व्यक्त केलंंय. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या ट्विटमुळे तणाव झाल्याचं सांगितलं. त्यावर आपण ट्विट केलं नसल्याचं स्पष्टीकरण बोम्मई यांनी दिलं. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावमध्ये यावं, आता बंदी नाही, असंही बोम्मईंनी स्पष्ट केलं.
बेळगावसह निप्पाणी आणि सीमाभागातील गावांवर कायम कर्नाटकी जुलूम होतो. त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती कायम संघर्ष करत असते. बेळगाव, निप्पाणीतील मराठी जनतेवर जाणूनबुजून जबरदस्ती केली जाते, याविरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवला. पण कर्नाटक सरकारने कधीही दया दाखवली नाही. आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेतल्यामुळे दोन्ही राज्यांतील सीमाभागात शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.