Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींना धक्का ! आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार
लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेतील समोर आलेल्या अटीनुसार एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही. राज्यातील ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. त्यामुळे आता राज्यात सुमारे आठ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारने 2023 साली केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेनंतर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरू केली. नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात. तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळतात.नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे. या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही.
एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी मिळणार आहे. मात्र नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1500 रुपयांच्या ऐवजी 500 रुपयेच मिळणार आहेत. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 9 हप्ते खात्यात जमा झाले आहेत. आता लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या प्रतीक्षेत आहेत.