Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांचे विधान; राजकीय वर्तुळात खळबळ
थोडक्यात
महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
बैलगाडीतून काढलेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या भाषणात त्यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा उल्लेख केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडानंतर पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तपास यंत्रणा अजूनही काम करत असताना, आष्टी-पाटोदाचे भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांनी कोणाचे नाव न घेता, एका मोठ्या नेत्याची “विकेट” पडल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे मुंडेंवर टीका केली.
चिखली येथे देवी लक्ष्मी मातेच्या नवसपूर्तीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात सुरेश धस यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बैलगाडीतून काढलेल्या मिरवणुकीनंतर झालेल्या भाषणात त्यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा उल्लेख केला. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनात हा मुद्दा मांडल्याचे सांगत त्यांनी न्याय मिळवून दिल्याचा दावा केला. यातच एका मोठ्या नेत्याचा “क्लीन बोल्ड” झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या भाषणात धस यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत, आज दिल्या जाणाऱ्या घोषणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "जिंदाबाद" म्हणणाऱ्यांनी कोणत्या नेत्याचे नाव घ्यावे, याचे भान राहायला हवे, असे ते म्हणाले. तसेच छाताड फुगवून वावरणारे किंवा बाह्य देखाव्यावर भर देणारे नेते विधानभवनात जास्त काळ टिकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
सुरेश धस यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना, जनतेच्या विश्वासामुळेच ते आमदार झाले असल्याचे नमूद केले. कारखाना किंवा संस्था नसतानाही लोकांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच मी खरा सम्राट असल्याचे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चा निर्माण झाल्या आहेत.