Jayant Patil : "आम्ही एकत्र लढणार...", जयंत पाटील यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन १० जून रोजी पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मात्र, यावर्षीच्या वर्धापन दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट – शरद पवार गट आणि अजित पवार गट – हे स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. त्यामुळे एकाच पक्षाच्या दोन मेळाव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
जयंत पाटील यांची स्पष्ट भूमिका
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात सध्या कुठलीही चर्चा सुरू नाही," असं ठामपणे सांगितलं. ते पुढे म्हणाले, "ही चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू आहे. प्रत्यक्षात आमच्याकडे कोणताही प्रस्ताव किंवा बोलणी झालेली नाहीत." त्याचवेळी त्यांनी अजून एक महत्त्वाचं विधान केलं की, "महाविकास आघाडी म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहोत." या वक्तव्यामुळे ठाकरे गट, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यातील एकजुटीचं पुन्हा एकदा संकेत मिळाले आहेत.
अजित पवार गटाचाही स्वतंत्र कार्यक्रम
दुसरीकडे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटही आपला स्वतंत्र वर्धापन दिन साजरा करणार आहे. दोन्ही गट ‘२६ वा वर्धापन दिन’ असल्याचा दावा करत आहेत, त्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अजित पवार यांच्या भाषणाकडेही तितकंच लक्ष लागलेलं आहे.
मनसेसाठी महाविकास आघाडीत जागा?
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, "राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही, हे निर्णय उद्धव ठाकरे यांनी घ्यावा. राज ठाकरे हे प्रभावी वक्ते आहेत, आणि आघाडीची ताकद वाढत असेल तर त्यांच्या सहभागात गैर काय?"