Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश
गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूंना एकत्रित आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आजच्या ऐतिहासिक मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत. या क्षणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचेही लक्ष लागले आहे. विशेषतः मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र येत असल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.
या मेळाव्यापूर्वी काही तास आधी चंदू मामा वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी अनेक वर्षांपासून हेच सांगत होतो की, भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही. माझ्या दीर्घकालीन प्रयत्नांना आज यश आलं आहे. तुळजाभवानी मातेच्या कृपेने ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. माझी प्रार्थना आहे की, हे दोघं मिळून महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं भलं करतील."
आजच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्यांची उपस्थिती असणार आहे. चंदू मामा वैद्य यांनी याची माहिती देताना सांगितले, "माझी बहीण शर्मिला ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सर्वच सदस्य आजच्या या आनंदसोहळ्यात सहभागी होणार आहेत. मंचावर ठाकरे बंधू आणि मंचाखाली ठाकरे परिवार हे एकत्र पाहायला मिळणं, हे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे."
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देताना चंदू मामा वैद्य म्हणाले, "बाळासाहेब आज असते तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला असता. मी मामा म्हणून सल्ला देण्यापेक्षा त्यांना नेहमीच सांगायचो, वेळ येऊ द्या, सगळं ठीक होईल. आज ती वेळ आली आहे आणि हे दृश्य सर्वांनी पाहावं, याचा मला मनस्वी आनंद आहे." आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यात शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी माणूस एकत्र येणार आहे. गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून मराठी अस्मितेच्या दृष्टीने ही एक नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे