Pune Sinhgad Fort : शरमेने मान खाली ! महाराजांच्या किल्ल्यावर परदेशी पर्यटकासोबत धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी परदेशी पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून एक वेगळी शान आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती ही सर्वदूर पसरलेली आहे. महाराजांचे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. हे किल्ले पाहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येत असतात. यामुळे शिवाजी महाराजांची शौर्यगाथा नवीन पिढीला समजण्यासाठी मदत होते. मात्र आता सिंहगड किल्ल्यावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघड झाले आहे.
न्यूझीलंड देशातून आलेल्या पर्यटकाबरोबर महाराष्ट्रातील काही तरुणांनी गैरवर्तन केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा पर्यटक सिंहगड किल्ला फिरत असताना त्याला महाराष्ट्रातील काही तरुण भेटले. या तरुणांनी विदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सांगितले. तरुणांच्या सांगण्यावरुन पर्यटकाने शिवीगाळदेखील केली. मात्र शिवीगाळ करत असताना चुकीचं असल्याची जाणीव झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या घटणेमुळे महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृतीला कलंक लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी विदेशी पर्यटकाला महाराजांचा अनुभव सांगण्याऐवजी त्याला शिवीगाळ करायला लावली. त्यामुळे या प्रकाराबद्दल खंत आणि संताप व्यक्त केला जात आहे.