मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील लिलावात राज्य सरकारनं केली खरेदी
नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासंबंधीत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे आपल्या मराठा साम्राज्यातील एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव आता महाराष्ट्रात येणार आहे.
याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी 1745 च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारतात सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता."
पुढे त्यांनी नमूद केले की, "आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि माझ्याच कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी 47.15 लाख रुपये राज्य सरकार देणार आहे."
"ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. 1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे", असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या संदर्भात माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार म्हणाले की, "शूर मराठा सरदार रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंग तलवार अनेकार्थांनी महत्वपूर्ण आहे. बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख तसेच नक्षीकाम केलेले आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते."