Sanjay Shirsat On UBT : "खोटं बोला, पण रेटून बोला"; संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर जहरी टिका
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत हे खोटारड्यांच्या यादीतला "हिरो" असल्याचा आरोप करत, त्यांनी उठावापासून आजपर्यंत एकही सत्य विधान केलं नसल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. याचवेळी, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यालाही ‘इव्हिनिंग वॉक’ असे संबोधित करत त्यांचा उपहास केला.
“संजय राऊत यांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्या” – शिरसाट
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्या पुस्तकासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. यावर भाष्य करताना शिरसाट म्हणाले, “राऊत यांच्या पुस्तकातील अनेक दावे बिनबुडाचे आहेत. त्यांची मानसिकता म्हणजे – खोटं बोला, पण रेटून बोला. त्यामुळे त्यांना ‘खोटं बोलण्याचा पुरस्कार’ द्यायला हवा.” ते पुढे म्हणाले, “संजय राऊत हे खोटारड्यांमधील हिरो आहेत. त्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे आणि योग्यवेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.”
आदित्य ठाकरे यांचा दौरा म्हणजे ‘इव्हिनिंग वॉक’
शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे दौरा केला. त्यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्या कार्यालयातील लिफ्ट बंद असल्याबाबत टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले, “ठाकरे नेहमीप्रमाणे स्टाईलमध्ये इथे आले, थोडा ‘इव्हिनिंग वॉक’ केला असे संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यावर मिश्किल टिप्पणी केली. तसेच, कारखान्यांबाबत बोलताना म्हटले की, “आमच्याकडे कुठेही बोगस कारखाने नाहीत, ना कुठे अवाढव्य संपत्ती कमावली आहे. त्याची चौकशी सुरू आहे हे खुद्द ठाकरे यांनाही माहिती आहे. काचेमध्ये राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत.”
विधिमंडळ अधिवेशनात खात्याला योग्य न्याय मिळेल
आगामी पावसाळी अधिवेशनात सामाजिक न्याय विभागाला पुरेसा निधी मिळेल, असा विश्वासही शिरसाट यांनी व्यक्त केला. “मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. पुरवणी मागण्या सादर केल्या जातील,” असे ते म्हणाले.
तसेच, महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवत त्यांनी दावा केला की, “शरद पवार गटाचे तसेच काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाचे भवितव्य तर अजूनही अनिश्चित आहे.”
संभाजीनगरमधील गुन्हेगारीवर कठोर पावले उचलणार
शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना कारवाईचे स्पष्ट आदेश दिल्याचे शिरसाट यांनी सांगितले. “दरोडे, चोरीसारख्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पुन्हा एक बैठक घेऊन ठोस निर्देश दिले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.