जपानी मल्लांसोबत महाराष्ट्रीयन कुस्तीपटू करणार सराव; वाकायामा राज्याबरोबर सामंजस्य करार

जपानी मल्लांसोबत महाराष्ट्रीयन कुस्तीपटू करणार सराव; वाकायामा राज्याबरोबर सामंजस्य करार

जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर होणाऱ्या सामंजस्य करारातून राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होवून त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल.

जपानमधील वाकायामा राज्याच्या कुस्तीगीर संघटनेबरोबर होणाऱ्या सामंजस्य करारातून राज्यातील कुस्तीपटूंना तांत्रिक मदत होवून त्यांचे कौशल्य वाढण्यास मदत होईल. त्यामुळे विविध स्पर्धांमधील पदकांची संख्याही वाढेल, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य कराराप्रसंगी वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, आमदार मेघना बोर्डिकर- साकोरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त डॉ. सुहास दिवसे, वाकायामा राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष वातारू किमुरा, वाकायामाचे आमदार तानेगुची आदी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, या करारामुळे महाराष्ट्र व वाकायामा या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना परस्परांच्या देशात जाऊन एकत्र सराव, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे सुलभ होणार असून प्रशिक्षकांनाही सहकार्य करून खेळाडूंना नवनवीन तंत्रे शिकवणे शक्य होणार आहे. खेळाडूंचा दर्जा उंचावण्यासाठी याचा उपयोग होणार असून खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी उंचावण्यास मदत होणार आहे. पुणेस्थित असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ जपान (AFJ) या संस्थेच्या समन्वयाने हा करार साध्य झाला आहे. ही संस्था गेली ३२ वर्ष भारत व जपान या दोन देशांचे विविध क्षेत्रांतील संबंध दृढ करण्यासाठी झटत आहे. कुस्ती तथा मल्ल विद्येला मोठा इतिहास आहे. वैदीक काळापासून हा खेळ खेळला जातो. महाभारतातील प्राचीन ग्रंथांमध्ये मल्लविद्येचा उल्लेख अनेक प्रसंगांमध्ये आढळतो. भारताला जी 20 गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत व जपान या दोन जी २० समूहातील देशातील दोन राज्यांमध्ये होणारा करार हा सहकार्य वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

मंत्री महाजन म्हणाले, बदलत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीविषयक आयाम बरेच बदलले असून त्याअनुषंगाने राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदके मिळविता यावीत यासाठी राज्य शासन आणि वाकायामा स्टेट, जपान येथील वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. वाकायामा राज्याचे राज्यपाल शुहेइ किशिमोतो, या कराराच्या निमित्ताने राज्यात जास्तीत जास्त पदक विजेते कुस्तीपटू घडावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आणि जपान बरोबर इतरही क्षेत्रात मैत्रीचे संबंध यामुळे दृढ होतील, असे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com