महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारनं 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारनं 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय जुलैमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे 5 हजार 722 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत या कर्जमाफीची घोषणा केली होती. आज अखेर या योजनेसाठी 700 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेतला आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपया पर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून 700 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com