विधिमंडळात राडा; महेंद्र थोरवेंनी सांगितला संपूर्ण राड्याचा घटनाक्रम

विधिमंडळात राडा; महेंद्र थोरवेंनी सांगितला संपूर्ण राड्याचा घटनाक्रम

विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील आमदार भिडल्याने एकच खळबळ उडाली. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं आहे.
Published by :
shweta walge

विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील आमदार भिडल्याने एकच खळबळ उडाली. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण आलं आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. यावेळी भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली. यावरच महेंद्र थोरवे यांनी दादा भूसेंवर टीका करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

काय म्हणाले महेंद्र थोरवे?

बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी मुख्यमंत्री तसेच श्रीकांत शिंदेंनी फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणाले.

मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्ताने गेलो होतो. दोन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहोत. आमदार भरत गोगावले असतील मी स्वतः असेल, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलेलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतलं नाही.

मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. तुम्ही मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचे काम आहे. मला त्या ठिकाणी काम झालं पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं सांगितलं. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडीची शाब्दिक चकमक झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com