'या' ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शकांच्या पहिल्या पत्नीचे निधन; 'MISS YOU Mumma.. म्हणत मुलाने पोस्ट टाकत केल्या भावना व्यक्त
Mahesh Manjrekar First Wife Deepa Mehta Passed Away : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचे 25 सप्टेंबर रोजी निधन झाले. या बातमीने कलाविश्वासह चाहत्यांना धक्का बसला आहे. निधनानंतर मुलगा सत्या मांजरेकरने आईच्या आठवणीत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने एक जुना फोटो टाकत लिहिले “MISS YOU Mumma..” तसेच आईबद्दल इतरांनी शेअर केलेल्या पोस्टही आपल्या स्टोरीवर रीपोस्ट केल्या.
दीपा मेहता या प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या. त्यांच्या क्वीन ऑफ हार्ट्स या साड्यांच्या ब्रँडने फॅशन क्षेत्रात खास ओळख निर्माण केली होती. या ब्रँडची लोकप्रियता सामान्य लोकांबरोबरच अनेक कलाकारांमध्ये होती. मुलगी अश्वमी मांजरेकरही या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत असे. त्यामुळे दीपा यांचे काम कलाक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. बिग बॉस मराठी 5 फेम अंकिता प्रभू वालावलकरने त्यांना “प्रेरणास्त्रोत” म्हणून आठवले. "त्यांनी अनेक मुलींना स्वप्ने पाहायला शिकवले," असे म्हणत तिने त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली आणि सत्याला धीर दिला.
महेश मांजरेकर आणि दीपा यांचे लग्न 1987 साली झाले होते. त्यांना दोन मुले आहेत, सत्या आणि अश्वमी. घटस्फोटानंतर मुले आईसोबत राहत होती, तरी वडिलांशी त्यांचा संबंध कायम राहिला. नंतर महेश यांनी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी दुसरे लग्न केले.
दीपा मेहता यांच्या निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.