Mahesh Manjrekar : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटावर वाद, महेश मांजरेकरांचे स्पष्टीकरण म्हणाले...
महेश मांजरेकर दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॉपीराइट उल्लंघन, करारभंग आणि प्रेक्षकांची दिशाभूल केल्याचे आरोप करत दावा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना महेश मांजरेकर म्हणाले की, “हा चित्रपट कोणत्याही जुन्या सिनेमाचा सिक्वेल किंवा दुसरा भाग नाही. तो स्वतंत्र आणि पूर्णपणे मौलिक आहे.” त्यांनी स्पष्ट केलं की, चित्रपटाची कल्पना, कथा आणि पात्रं मूळ स्वरूपाची आहेत आणि कुठल्याही बौद्धिक मालमत्तेचं उल्लंघन केलेलं नाही.
मांजरेकरांनी सांगितलं की, “शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे. हा चित्रपट ऐतिहासिक आधार असला तरी तो भावनिक आणि प्रेरणादायी दृष्टीने साकारण्यात आला आहे.” त्यांनी सर्व आरोप फेटाळले असून, “शिवरायांच्या कथांवर चित्रपट बनवण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे,” अशी ठाम भूमिका मांडली आहे.