महिंद्रा अँड महिंद्राने BE 6 Batman Edition ही खास इलेक्ट्रिक कार लॉन्च
भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच आपल्या नवीन इलेक्ट्रिक कारसह चर्चेत आली आहे. BE 6 Batman Edition या खास व्हर्जनची सुरुवात कंपनीने केली असून, या सुपरकारची किंमत 27.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवण्यात आली आहे.
या कारची नोंदणी 23 ऑगस्टपासून सुरू होणार असून, ग्राहकांना 21,000 रुपयांची बुकिंग रक्कम जमा करावी लागणार आहे. 20 सप्टेंबरपासून विक्रीला सुरुवात होणार असून, हा दिवस ‘इंटरनॅशनल बॅटमॅन डे’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. विशेष म्हणजे या मॉडेलच्या केवळ 300 गाड्याच बाजारात उपलब्ध असणार आहेत.
महिंद्राने या व्हर्जनसाठी अमेरिकन फिल्म स्टुडिओ वॉर्नर ब्रदर्ससोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कारप्रेमींसाठी हा एक वेगळाच अनुभव ठरणार आहे. BE 6 Batman Edition ही कार BE6 च्या Pack Three व्हेरिएंटवर आधारित असून, मूळ किमतीपेक्षा जवळपास 89,000 रुपयांनी महाग आहे.
डिझाईनच्या दृष्टीने कार अत्यंत आकर्षक आहे. सॅटिन ब्लॅक रंग, गोल्डन बॅटमॅन लोगो, व्हील आर्ट आणि बम्परवरील ग्लॉस फिनिश हे तिचे वैशिष्ट्य आहे. इंटिरियरमध्येही गोल्डन अॅक्सेंट्स, डॅशबोर्ड आणि सीट्सवर खास डिझाईन दिले आहे.
कारमध्ये 79kWh क्षमतेची बॅटरी असून, एका चार्जमध्ये तब्बल 682 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळते, असा कंपनीचा दावा आहे. या दमदार फीचर्समुळे आणि मर्यादित उपलब्धतेमुळे ही कार बाजारात ‘कलेक्टर एडिशन’ ठरण्याची शक्यता आहे.