Ladki Bahin Yojana : मोठा खुलासा! लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिला अपात्र ; शासनाची कारवाई सुरू
राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये मिळणाऱ्या महिलांपैकी तब्बल 26.34 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने ही माहिती अधिकृतरित्या जाहीर केली असून शासनाने याबाबत कारवाई सुरू केली आहे.
राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या योजनेचा अनेकांनी अयोग्य लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. पात्रतेच्या अटींनुसार, लाभार्थी महिलांनी इतर कोणतीही शासकीय योजना घेऊ नये. मात्र तपासणीत असे आढळून आले की, अनेक महिलांनी एकापेक्षा जास्त योजना घेतल्या आहेत. त्यामुळे अशा अर्जदारांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली की, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने सर्व लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये अपात्र ठरलेल्या लाखो महिलांची माहिती समोर आली असून त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की योजना बंद होणार नाही, मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. येत्या काळात अजून काही अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुनिश्चित करण्यासाठी अधिक काटेकोर प्रक्रिया राबवली जाणार आहे.